अलिकडे सर्वत्र वाहनांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या वाढत्या संख्येसोबत रस्त्यांचे जाळेही मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. राज्य आणि परराज्यातील वाढलेली दळणवळणाची साधने, या अनुषंगाने राज्यात सीमा
तपासणी नाके वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यात नवीन चेक पोस्ट नाके वाढल्यास परिवहन विभागाच्या महसूलात वाढ तर होईलच, शिवाय मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणीदेखील होऊ शकणार आहे. या मुद्दयाकडे परिवहन आयुक्तांनी गंभीरतेने लक्ष घालावे, अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत आरटीओ विभागाची एकूण 22 सीमा तपासणी नाके आहेत. त्याद्वारे शासनाला दरवर्षी शेकडो कोटी रुपये महसूल मिळतो. राज्य सीमालगतच्या जुन्या व नव्या वर्दळीच्या रस्त्यांवर, ज्या ठिकाणी आरटीओ चेक पॉईंट अथवा नाके नाहीत, अशा मार्गांवर नवीन चेक पॉईंट किंवा नाक्यांची निर्मिती झाल्यास परिवहन विभागाच्या महसूलात आणखी मोठी भर पडणार आहे. याखेरीज, मोटार वाहन कायद्याची ठोसपणे अंमलबजावणीसुद्धा होईल. कारण, सीमा तपासणी नाक्यांवर परराज्यातील व्यावसायिक, यात्रिक वाहनांची कागदपत्रे, विमा, परमिट, फि टनेस, लायसेन्स, क्षमतानुसार भार व इतर महत्वपूर्ण गोष्टींची तपासणी केली जाते.
महसूल वाढीसह मोटार वाहन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता शासनाने राज्यात नवीन सीमा तपासणी नाके वा पॉईंट निर्मिती केल्यास ती खालीलप्रमाणे विभागनुसार होऊ शकतात.
धुळे विभाग-शहादा-खेतिया रस्ता : नंदुरबार जिल्ह्यातील मध्यप्रदेश सीमावर्ती भागात असणारा शहादा-खेतिया रस्ता हा हलके व अवजड वाहन वर्दळीचा मार्ग आहे. अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गाला जोडणारा हा रस्ता शहादा (जि. नंदुरबार) येथून खेतियाकडे जातो. पुढे तो पानसेमल (मध्यप्रदेश) गावाला मिळतो आणि तेथून तो एकीकडे पलसोल, बडवाणीकडे तर दुसरीकडे सेंधवा-इंदौरकडे जातो. हा रस्ता सुस्थितीत असून मध्यप्रदेशात या रस्त्यावर आधुनिक असा सीमा तपासणी नाका आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत या रस्त्यावर कुठेही आरटीओचा चेक पॉईट अथवा नाके नाही. या मार्गावरून गुजरात, महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश अशा तिन्ही राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरु असते.
शहादा-चोपडा रस्ता (बोराडी मार्गे) : राज्य मार्ग क्रमांक 1 अशी शासन दप्तरी नोंद असलेला हा रस्ता कित्येक सरकारे आली आणि गेलीत तरीसुद्धा अद्यापही विकसित झालेला नाही. जर ह्या मार्गाचा खर्या अर्थाने रस्ते विकास झाला तर अस्तित्वातील अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्गाचे अंतर कमी होईल. मध्यप्रदेश सीमेला लागून असलेल्या मालकातर (ता. शिरपूर) येथून हा रस्ता जातो. मालकातर येथून उत्तरेकडे पानसेमल (मध्यप्रदेश), पश्चिमेकडे शहादा (जि. नंदुरबार) आणि पूर्वेकडे बोराडी (ता. शिरपूर जि. धुळे)कडे जाता येते. बोराडी येथून शिरपूरकडे आणि सांगवी-पळासनेरकडे जाता येते. पळासनेरकडून सेंधवा तर सांगवी येथून आंबे, आंबेकडून वरला-वलवाडी, खामखेडा (ता. शिरपूर)-लासूर मार्गे चोपडाकडे येता येते. वलवाडी येथून सेंधवा आणि खरगोन (मध्यप्रदेश)कडे जाता येते. परंतु, हा रस्ता विकसित व सुरक्षितही नसल्या कारणास्तव वाहनचालक हा मार्ग टाळतात. परंतु, अवैध व्यवसायाकरिता हा मार्ग सुरक्षित असल्याने इथे अधिकतर चोरटीच वाहतूक चालते.
अमरावती विभाग - परतवाडा रस्ता : मेळघाटातील परतवाडा रस्त्यावर महाराष्ट्रातील वाहतूक ही मध्यप्रदेशमध्ये चालते. पूर्वी तेथे सीमा तपासणी केंद्र कार्यरत होते. मात्र, मागील काही वर्षांपासून ते बंद करण्यात आले आहे.
वरूड-पांढूरणा रस्ता : या रस्त्यावर पूर्वी सीमा तपासणी नाके होते. परंतु, हल्ली ते बहीरण येथे आधुनिक सीमा तपासणी नाक्यांत रुपांतरित झाल्यामुळे सध्या ह्या रस्त्यावर आरटीओचे नियंत्रण राहिलेले नाही.
नागपूर विभाग - या विभागाच्या अखत्यारित गडचिरोली ते कुटर्वेडा (एन.एच. 930) आणि गडचिरोली ते उम्री (एन.एच. 3536) या मार्गांवर नवीन सीमा तपासणी नाक्यांची निर्मिती केली जाऊ शकते.
चंद्रपूर विभाग - या विभागातील कोरपाना ते अलिदाबाद रस्त्यावर पूर्वी आरटीओचे चेक पॉईंट होते. गेल्या काही दिवसांपासून ते बंद करण्यात आलेले आहे. या मार्गावर हलके व अजवड वाहनांची मोठी वर्दळ असते.
नांदेड - या विभागांतर्गत धर्माबाद ते बासर रोड, भोलसा ते तनूर, देगतूर ते बिदर, माहूरगड ते निर्मल या मार्गांवर आरटीओ चेक पॉईट अथवा नाक्यांची निर्मिती केली जाऊ शकते.
कोल्हापूर - मिरज ते जेठा रोडमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनाची वाहतूक होत असते.
उपरोक्त विभागनिहाय मार्गांवर नवीन सीमा तपासणी नाके वा चेक पॉईंट कार्यरत झाल्यास चोरटी वाहतूक, अनफि ट वाहने, कागदपत्रांची अपूर्ता असणारी वाहने, चोरटी वाहने यांच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाऊ शकते. सिमा तपासणी नाके हे राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देतात. त्यामुळे वाढणार्या नवीन सीमा तपासणी नाके राज्याला वाढीव महसूल देतील, यात शंकाच नाही.